नेवल युनिट एनसीसीचे ५ नोव्हेंबरपासून ‘कोकण रत्न’ राष्ट्रीय शिबिर

रत्नागिरी : दोन – महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी कार्यालयाकडून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील ‘कोकण रत्न’ हे मेनू शिबिर होत आहे, अशी माहिती कमांडिंग ऑफीसर कमांडर के. राजेश कुमार यांनी दिली.

‘हमारा समुंदर हमारी शान’ हे ब्रीद घेऊन हे १० दिवसांचे शिबिर होणार आहे. ‘कोकण रत्न’ शिबिराचा प्रारंभ ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता अल्ट्राटेक जेटीवर एससीसीचे एडीजी मेजर जनरल योगेंदर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी ते जयगड ते बोरिया आणि परत याच मार्गाने रत्नागिरी असा १२२ नॉटिकल मैलांचे हे नौकाभ्रमण असणार आहे. शिबिरामध्ये पुणे, मुंबई अ आणि ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेड क्वार्टरमधून ६० राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट सहभागी होणार आहेत.

पथनाट्यातून समुद्र स्वच्छतेविषयी विशेषत: सागरी किनारे स्वच्छतेचा संदेश या भ्रमणातून देण्यात येणार आहे. ‘हमारा समुंदर, हमारी शान’ हे घोषित वाक्य घेऊन स्वच्छता, सुरक्षितता याविषयी जनजागृती होणार आहे.

नौसेना आणि कोस्टगार्ड या दोघांचेही या शिबिरासाठी सहकार्य असणार आहे. पश्चिमी कमांडिंग युनिटच्या माध्यमातून हवामान बदलाबाबतची माहिती मिळणार आहे. कोस्टगार्डच्या माध्यमातून सर्च, रेस्क्यू, हेलिकॉप्टर आदींची मदत होणार आहे. एक सुरक्षा बोट, २ रेस्क्यू बोटी आणि नेव्हीचे सेलर यांचाही समावेश असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 22-10-2024