Rajapur : सोशल मीडियावर बोट उलटल्याच्या संदेशाने पोलिस अलर्ट; दुर्घटना घडली नसल्याचे स्पष्ट

राजापूर : तालुका नैसर्गिक आपत्ती निवारण या सोशल मीडिया ग्रुपवर कशेळी येथे बोट उलटल्याची काही घटना घडली आहे का? असा संदेश टाकण्यात आला. या संदेशाने सर्वत्र खळबळ उडाली. याची दखल घेत नाटे सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस प्रवर अधिकारी प्रमोद वाघ यांनी झटपट हालचाल केली व सुदैवाने अशाप्रकारची कोणतीही दुर्घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

आपल्या कार्यक्षेत्रातील सागवे येथे जात असतानाच त्यांनी गाडी वळवून थेट कशेळीच्या दिशेने धाव घेतली. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण पोलिस यंत्रणा तसेच कशेळीचे पोलिस पाटील प्रमोद व राजन आगवेकर यांना तातडीने माहिती दिली. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस पाटील प्रमोद सुतार, राजन आगवेकर तसेच पोलिस कॉन्स्टेबल इंगळे व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कशेळी जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर पाहणी करून बोट मालकांकडे चौकशी केली. याच दरम्यान जिल्ह्यातील काही पत्रकारांनी स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पत्रकारांनीही पोलिस यंत्रणेशी विचारणा केली असता सुदैवाने अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या छोट्याशा संदेशावरूनदेखील नाटे पोलिस ठाण्याची तत्परता, कशेळी पोलिस पाटलांची जागरूकता व पोलिसांनी झपाट्याने केलेली कार्यवाही कौतुकास्पद ठरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 25/Sep/2025