krushi samruddhi Yojana : शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी कृषी समृद्धी योजनेतून जिल्ह्याला मिळणार ७४ कोटी

दापोली : राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी समृद्धी योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे आणि पिकांमध्ये विविधता आणणे हा आहे.

या योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात दरवर्षी ५ हजार कोटींचा निधी मिळणार असून, पाच वर्षात २५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनांसाठी मिळणार आहे. या योजने अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला ७४ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी १७ कोटी ६८ लाख निधीला मंजुरी मिळाली आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्याला कोट्यवधीचा निधी प्राप्त होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक कृषी सजातील सहाय्यक कृषी अधिकारी यांना जवळपास ५० लाखाचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनांसाठी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर या योजनेची माहिती मिळणार आहे. राज्य कृषि यांत्रिकीकरण योजना, त्यामध्ये ब्रश कटर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, फवारणी पंप मिळणार आहेत.

त्या मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मुख्यमंत्री कृषि व अन्नप्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना या योजनांचा समावेश या योजनेत असणार आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची ऍग्रीस्टॅक नोंदनी असणे आवश्यक आहे. तर या योजनेत शेतकऱ्यांना ४० आणि महिला शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान असणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 25/Sep/2025