रत्नागिरी : सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या नवरात्रौत्सवनिमित्त रत्नागिरी येथील फूल, फळबाजार खरेदीसाठी गजबजून गेला होता. दसरा सण येत्या काहीच दिवसांवर येवून ठेपल्यामुळे झेंडूच्या फूलांना मोठी मागणी असते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्यामुळे उत्पादनास फटका बसला आहे. त्यामुळे आतासध्या झेंडूची फुले १०० ते १५० रूपये किलोदराने विक्री होत आहे तर सफरचंद २०० रूपयांनी विक्री होत आहे. येत्या काही दिवसात फूलांसह फळांचे दर वाढणार असल्याचे सांगण्यात आले.
यावर्षी खरीप हंगामात झेंडू, गुलाब, शेवंती, मोगरा, निशिगंध लागवड पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात झाली आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे.
ठिकठिकाणी देवींची प्रतिष्ठापना झालेली आहे. रत्नागिरी शहरातील विविध फूल विक्रेत्यांकडे पश्चिम महाराष्ट्रातून झेंडूची सुमारे १० ते १५ टन इतकी आवक होत असते.
या फळांना मागणी वाढली
नवरात्रोत्सवात भाविक उपवास ठेवत असतात. त्यामुळे प्रामुख्याने सफरचंद, केळी, संत्री, डाळिंब, द्राक्षे, चिकु यासह इतर फळांना मोठी मागणी असते. ही फळे जीवनसत्वे, खनिजे आणि नैसर्गिक शर्करेचा चांगला स्त्रोत आहेत तसेच उपवास करताना शरीराच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करतात.
नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणात फुलांना मागणी असते. रत्नागिरी शहर, जिल्ह्यात झेंडूसह विविध फुले विक्रीस दाखल झालेली असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. आता प्रतिकिलो १५० रूपयांपर्यंत तर दर आहेत. येत्या दसऱ्यात हे दर २०० ते २५०च्या घरात जातील- सचिन पवार, फुल विक्रेते
नवरात्रौत्सव सुरू झाल्यामुळे पूजेसाठी झेंडूसह विविध फूले लागत असतात. त्यामुळे स्थानिकसह परजिल्ह्यातील शेतकरीही झेंडूची फूले घेवून रत्नागिरीसह विविध ठिकाणी विक्री करीत आहेत. देवीचा तयार हार ५० रूपयांपासून ते ५०० रूपयांपर्यंत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 25/Sep/2025














