Khed : रस्ता दुरुस्तीसाठी २ ऑक्टोबरपासून उपोषण

खेड : सवणस, रांगडेवाडी ते अणसपुरे तसेच मुळगाव ते घोणसवणे वाडी या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे व वाहतुकीसाठी अत्यंत खराब परिस्थितीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून शासनदरबारी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

बळदेववाडी, अणसपुरे, सडेवाडी, घोणसवणे वाडी, तळपर आदी गावांतील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या विभागात तब्बल १० ते १५ जांभा खाणी असून याठिकाणाहून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर जांभा पुरवठा केला जातो. शासनाला या खाणीतून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असूनही रस्त्यांची दुरवस्था कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेवक हशमत परकार हे २ ऑक्टोबर २०२५ पासून सवणस गावामध्ये रस्त्याकिनारी उपोषणास बसणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य नफीसा परकार यांनी दिली. या संदर्भातील निवेदन खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार खेड तसेच पोलिस निरीक्षक खेड यांना देण्यात आले असून ग्रामस्थांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात यावेळी करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 26/Sep/2025