चिपळूण : चिपळूण नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने चिपळूण शहर परिसरातील अनेक विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेवर धडक दिली. यावेळी अतिरिक्त (प्रभारी) मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण व नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी पेढांबकर व प्रशासकीय कार्यालयीन अधिकारी मोरे व सर्व खातेप्रमुख यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रध खताते, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रामुख्याने चिपळूण शहरातील रस्त्यांची दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, रहिवास इमारतीमधील अॅप्रोच रोड, गटारे, तसेच राधाकृष्ण नगरमधील महिला क्रीडा संकुल, उक्ताड स्मशान शेड आदी विकासकामांबाबत चर्चा झाली. तसेच आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून बहादूरशेख नाका ते चिंचनाका व चिंचनाका ते पॉवर हाऊसपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचा प्रस्ताव आदी मागण्या केल्या.
राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष उदय ओतारी यांनी, शहरातील रस्त्यांची डागडुजी, मुख्य व अंतर्गत रस्त्यांची पुनर्बाधणी, यासाठीचा नगर परिषदकडे असणारा निधी व अधिकचा निधी हवा असल्यास आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून निधीसाठी प्रस्ताव तयार करावा असे सूचवले. त्याचप्रमाणे शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येबाबत चर्चा झाली, यामध्ये नसबंदी झालेल्या श्वानांना बारकोड टॅगिंग करणे, याची माहिती नगर परिषद व पशुवैद्यकीय खात्याकडे असावी, एका क्लिकवर नसबंदीबाबत नागरिकांना माहिती व्हावी आदी मुद्दे उपस्थित करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, प्रदेश सचिव जयंद्र खताते, शहर कार्याध्यक्ष उदय ओतारी, महिला जिल्हा उपाध्यक्ष रविना गुजर, महिला शहर अध्यक्ष आदिती देशपांडे, माजी नगरसेविका फैरोजा मोडक, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, युवक अध्यक्ष योगेश पवार, मनोज जाधव, खालिद दाभोलकर, सिद्धेश लाड, किसन चिपळूणकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 26/Sep/2025














