रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या आंतर-महाविद्यालयीन पुरुष आणि महिला जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने (स्वायत्त) दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
१६ ते १७ सप्टेंबर रोजी डोंबिवली येथे झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाने २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच महिला संघाने या स्पर्धेत सर्वसाधारण उपविजेतेपदाचा मान मिळवला आहे.
पुरुष गटात, महाविद्यालयाचा खेळाडू करण महेश मिलके याने १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्य पदक जिंकले.
महिला गटात सर्वात लक्षवेधी कामगिरी कु. तनया महेश मिलके हिने केली. तिने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सुवर्ण पदक पटकावले, तर १०० मीटर बॅकस्ट्रोक, २०० मीटर संमिश्र, ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल आणि २०० मीटर बटरफ्लाय या प्रकारांमध्ये रौप्य पदके मिळवली. तसेच, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक, २०० मीटर बॅकस्ट्रोक आणि ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिने कांस्य पदके जिंकली.
महिलांच्या ४×४०० मीटर फ्रीस्टाईल रिले संघानेही उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या विजयी संघात कु. तनया मिलके, कु. संस्कृती जाधव, कु. श्रावणी सावंत आणि कु. नफिजा मंगा यांचा समावेश होता.
या यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आणि महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे अध्यक्ष श्री. महेश मिलके यांनी मार्गदर्शन केले. तसेच, सौ. गौरी मिलके आणि सहाय्यक क्रीडाशिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांचेही सहकार्य लाभले.
महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 26-09-2025














