Dapoli: दापोलीत ‘सन्मान नवदुर्गांचा’ विशेष उपक्रम

दापोली : दापोली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘सन्मान नवदुर्गांचा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा तसेच सामाजिक, वैद्यकीय आणि पोलीस क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांचा उचित गौरव करण्यात आला.

हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष साधना बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. कार्यक्रमास महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महसूल विभाग, आरोग्य विभाग आणि इतर शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘नवदुर्गा’ मानून त्यांचा फुलांचा गुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, महिलांचे योगदान केवळ घरापुरते मर्यादित नसून त्या समाजाच्या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. सरकारी नोकरीत तसेच सामाजिक कार्यात महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर या नवदुर्गांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा देणाऱ्या महिला डॉक्टर, नर्सेस तसेच पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिसांचा देखील कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्याची ही एक आदर्श परंपरा असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या शेवटी महिला सक्षमीकरण आणि समान हक्क याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे दापोलीतील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा कार्यक्रम स्मरणीय ठरला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 26-09-2025