Chiplun : तुरंबव रस्त्यावर दुहेरी वाहतुकीची मागणी – संदीप सावंत

चिपळूण : तालुक्यातील तुरंबव येथे शारदादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या मंदिरात येण्या जाण्यासाठी दोन मुख्य रस्ते आहेत. हे दोन्ही रस्ते चांगले असताना तेथे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. परिणामी, भाविकांना १० ते १५ किमीचा वळसा मारून देवीच्या दर्शनासाठी जावे लागते. त्यामुळे निवळी-तुरंबव व आबिटगाव तुरंबव रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू न केल्यास बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

पोलिस प्रशासनाने तुरंबव येथे एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे. त्यावर अखिल भारतीय मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, निवळी-तुरंबव रस्ता व आबिटगाव-तुरंबव असे दोन रस्ते शारदादेवी मंदिराकडे जाण्यासाठी आहेत. हे दोन्ही चांगले रस्ते उपलब्ध असतानाही ते बंद केले आहेत. येथे वाहतूक फक्त एका बाजूने येण्यासाठी व दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे भाविकांना आणि गाडीचालकांना किमान १० ते १५ किमीचा नाहक वळसा घालावा लागतो. सर्वसामान्य भाविकांना व स्थानिकांना त्याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे निवळी-तुरंबव व आबिटगाव-तुरंबव या दोन्ही रस्त्याची वाहतूक दोन्ही बाजूने सुरू करावी. तसे न केल्यास जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाविरोधात बोंबाबोंब आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 26/Sep/2025