रत्नागिरी : शहरातील के. सी. जैन नगर येथील श्री व्याघ्रेश्वरी अंबामाता मंदिरात सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. घटस्थापनेने या नऊ दिवसांच्या उत्सवाची सुरुवात झाली असून, २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज सकाळी ८ वाजता देवीची पूजा, अभिषेक आणि कुंकुमार्चन केले जात आहे. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री सूक्ताचे पठण आणि हवन, तसेच दुर्गासप्तशतीचे पाठ आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ११ वाजता देवीला नैवेद्य अर्पण केला जातो आणि दुपारी १२ वाजता महाआरती केली जाते. संध्याकाळी ६ ते ७. ३० या वेळेत श्री माऊली महिला भजन मंडळ, रवींद्रनगर, रत्नागिरी यांच्यातर्फे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७. ३० वाजता महाआरती आणि तीर्थप्रसादाचे वाटप केले जाईल.
या वर्षी नवरात्रोत्सवात विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत नवचंडी होम आणि खिचडी प्रसादाचे वाटप होणार आहे. तसेच, शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता विजयादशमीची पूजा होणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून, भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिर समितीने सर्व भाविकांना उपस्थित राहून या उत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:52 26-09-2025














