रत्नागिरी : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार १९१ वीजग्राहक स्वावलंबी झाले आहेत. त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेलच्या माध्यमातून ४.२१ मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत आहे. सेवा पंधरवड्यांतर्गत विशेष अभियान राबवून ग्राहकांना मोफत वीज देण्यात आली.
घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौरउर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा १२० ते ३६० युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर उर्जानिर्मिती संच बसवता यावा, यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. याबरोबरच महावितरणकडून १० किलोवॅटपर्यंतच्या अर्जाना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. सौर नेट मीटर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अतिरिक्त वीज विकता येते
एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार महिना १२० युनिट वीजनिर्मिती होते. वीज ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीज सौर उर्जा प्रकल्पातून तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येते.
पीएम सूर्यघर योजनेत सौर ऊर्जा संच बसवणाऱ्या ग्राहकांना जवळपास मोफत वीज मिळत आहे. शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या योजनेचा घरगुती ग्राहक व निवासी संकुलांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून या संबंधातील सर्व प्रक्रिया ऑनलाइन व सुलभकरण्यात आली आहे- अनिल डोये, मुख्य अभियंता, महावितरण.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:31 PM 26/Sep/2025














