पावस ः आर्थिक समावेशन योजनांबाबत बँक ऑफ इंडियातर्फे गोळप ग्रामपंचायतीत जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रि-केवायसी, डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले.
भारत सरकारच्या वित्त मंत्रालय वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडियातर्फे गोळप ग्रामपंचायतीत आर्थिक समावेशन योजनांबाबत जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. या वेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक अमित सिन्हा, बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे आंचलिक प्रबंधक सागर नाईक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक पद्मसिंग पाटील, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर गिम्हवणेकर, रिझर्व्ह बँकेचे प्रबंधक विजय कोरडे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, बँक ऑफ इंडिया पावस शाखा व्यवस्थापक रचना भोसले, गोळप सरपंच प्रियांका सुर्वे, ग्रामविकास अधिकारी भगत आदी उपस्थित होते. या प्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक सिन्हा यांनी रि-केवायसीबाबत मार्गदर्शन केले. डिजिटल फसवणूक टाळण्याचे उपाय आणि डिजिटल अरेस्ट या महत्त्वाच्या विषयावर माहिती दिली. या वेळी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास बँक ऑफ इंडियाद्वारे २ लाख रुपयांचा दावा धनादेश प्रदान करण्यात आला. सूत्रसंचालन वरिष्ठ प्रबंधक संकेत सकपाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 26-09-2025














