रत्नागिरी : खरीप हंगाम २०२५ मध्ये शेतकरी स्तरावरून आजअखेर १० हजार ९८३ खातेदारांनी एकूण १७हजार ३८७.१० हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी अंतर्गत नोंद केली आहे. जिल्ह्यात ई-पीक पाहणी नोंदणीसाठी प्रतिसाद कमी असल्यामुळे खरीप पिकांची नोंद ई-पीक पाहणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पीक विमा योजनेत सहभाग, पीक कर्ज, नुकसान भरपाई, शासकीय भात खरेदी-विक्री व शासनाच्या इतर योजनेकरिता ई-पीक पाहणी करणे बंधनकारक असल्याने उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल एप्लीकेशनमध्ये ऑनलाईन पद्धतीने खरीप हंगामातील पिके तसेच फळपिकांची नोंद करावी.
यापूर्वी हा कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत होता. राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणांमुळे शेतकरी पिकाची नोंद करण्यापासून वंचित राहू नये, याकरिता शासनाकडून शेतकरी स्तरावरील पीक नोंदणीसाठी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यांनतर ई-पीक पाहणीची टक्केवारी कमी असल्याने शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. ई-पीक पाहणी हा शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती स्वतः डिजीटल पद्धतीने नोंद करता येते. या प्रणालीमुळे पिकांची अचूक माहिती सरकारकडे जमा होते, ज्यामुळे शेतीविषयक योजना, पीक विमा योजना आणि इतर शासकीय अनुदानासाठी याचा उपयोग होतो.
खरीप हंगाम २०२५ साठी पीकांची नोंद ई पीक पाहणी डीसीएस मोबाईल एप्लीकेशन मध्ये शेतकरी स्तरावरील ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे-शिवकुमार सदाफुले,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 27/Sep/2025














