आरवली : रत्नागिरी येथील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बांधलेले वसतिगृह लवकर सुरु व्हावे, यासाठी अल्पसंख्याक खात्याचे मंत्री ना. माणिकराव कोकाटे यांच्याकडे आपण मागणी करू तसेच अल्पसंख्यांक समाजाला आगामी निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन सत्तेत या घटकाला सामावून घेण्यात येईल, अल्पसंख्याक समाजातील विकासकामे करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार शेखर निकम यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल जिल्हा कार्यकारिणीच्या सावर्डे येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी अल्पसंख्याक सेलच्या वतीने केलेल्या कार्याचा व उपक्रमाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रत्नागिरी येथील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेले वसतिगृह बंद असल्याचे सांगून याकडे आमदार निकम यांचे लक्ष वेधले. मशिदीवरील भोंगे लावण्यासाठी शासनाकडून तीन महिन्यांची परवानगी देण्यात येते. त्या परवानगीचा कालावधी एक वर्षाचा करण्यात यावा, शासकीय समित्यांवर अल्पसंख्यांक समाजातील सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रधान्याने देण्यात यावी, अशा अनेक मागण्या शेकासन यांनी यावेळी केल्या.
या बैठकीला अल्पसंख्याक सेल जिल्हा उपाध्यक्ष इमाम शहा, अकबर दसुरकर, डॉ. शामिना परकार, संगमेश्वर तालुका संघटक माजी नगरसेविका फैरोजा मोडक, संगमेश्वर तालुका अल्पसंख्याक महिला अध्यक्षा सबिहा नेवरेकर, दापोली अल्पसंख्याक सेल अध्यक्ष नईम हुनेरकर, मुखतार तांबू, लतीफ परकार, अली परकार, जमीर मुल्लाजी, असगर नाखुदा उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 27/Sep/2025














