लांजा : वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या तुफानी पावसामुळे कणगवली शाळा येथील विजेचा रोहित्रासह सात वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे गावातील ३०० घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. संपूर्ण गाव अंधारात बुडाले आहे. सोमवारी दुपारी २.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे.
तालुक्यातील कणगवली शाळा या ठिकाणी संपूर्ण कणगवली गावाला विद्युत पुरवठा करणारे रोहित्र आहे. मात्र हे रोहित्र धोकादायक स्थितीत होते. गेल्या दोन वर्षांपासून येथील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल इंगळे यांनी सातत्याने महावितरणच्या कार्यालयाकडे हे रोहित्र तत्काळ बदलण्यात यावे, अशी मागणी केली होती. मात्र महावितरणकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते. सोमवारी विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह कोसळलेला पावसामुळे संपूर्ण गावाला वीजपुरवठा करणारे रोहित्र कोसळले. या रोहित्रासह आजुबाजूचे सात ते आठ खांब कोसळल्याने संपूर्ण कणगवली गाव अंधारात बुडाले. गावातील आठ वाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला असून ३०० घरे अंधारात आहेत. या घटनेमुळे महावितरणचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असले तरी त्यांच्याच दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून ग्रामस्थांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मागणीकडे दुर्लक्ष
कणगवली काल दुपारी जोरदार पाऊस झाला. यामध्ये रोहित्र कोसळले. यापूर्वी धोकादायक बनलेले हे रोहित्र तात्काळ बदलण्यात यावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल इंगळे यांनी केली होती. मात्र त्याकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 22/Oct/2024














