Nipun Maharashtra Abhiyan : जिल्ह्यात शाळांची अध्ययन स्तर निश्चितीचे ७८ टक्के काम पूर्ण

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्यांत वृद्धी करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात कृती कार्यक्रम राबविला जात आहे. अध्ययन स्तर निश्चिती हा या उपक्रमाचा पहिला टप्पा. भावी पिढीचे हित लक्षात घेता प्रशासनाने या उपक्रमात झोकून दिले असून रत्नागिरी जिल्ह्यातील २२३ पर्यवेक्षकांनी अध्ययन स्तर निश्चितीचे ७८ टक्के काम पूर्ण करत लक्षवेधी कामगिरी केली आहे.

‘निपुण भारत’ अभियानाला गती मिळावी आणि राज्यातील इयत्ता दुसरी ते पाचवीतील ३७ लाख मुलांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्यांचा विकास व्हावा, यासाठी शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (एससीईआरटीएम), पुणे यांच्या पुढाकारातून वॉवेल्स ऑफ द पीपल असोसिएशन (वोपा), पुणे यांच्या तांत्रिक भागीदारीने ‘निपुण महाराष्ट्र अॅप’ची निर्मिती करण्यात आलेली आहे. राज्यासाठी हे अॅप उपलब्ध करून देणाऱ्या वोपा या संस्थेने याअगोदर ठाणे, बीड, वर्धा, पालघर अशा विविध जिल्ह्यात गुणवत्ता वाढीसाठी उपयुक्त ठरणारे पथदर्शी प्रकल्प यशस्वी करून दाखविले आहेत.

निपुण महाराष्ट्र अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर प्रगतीचे संपूर्ण मूल्यांकन एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि पुरावाआधारित पद्धतीने अचूकपणे केले जाते. विद्यार्थ्यांस केंद्रबिंदू मानून पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय अधिकारी या चारही घटकांचा विचार केल्यानंतर आणि विविध चाचण्या घेऊनच या अॅपची निर्मिती करण्यात आलेली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकीय अधिकारी यांना तत्काळ (रिअल टाईम) माहितीचे विश्लेषण अॅपवर उपलब्ध होते. त्याचवेळी पालकांनाही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष ठेवता येते.

एआय आधारित वाचन सराव हे फीचर वापरकर्त्यासाठी रंजक आहे. याद्वारे वाचनाचा वेग, वाचनाची अचूकता, चुकीचे वाचलेले शब्द या बाबी तत्काळ समजतात. लेखन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रीया या विषयांसाठीदेखील अॅपमध्ये छायाचित्र पुरावा (फोटो इविडन्स) घेता येतो. आपल्या पाल्याची ही सर्व माहिती प्रत्येक पालकाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पाल्याची शैक्षणिक सद्यस्थिती समजणार असून पुढील स्तरावर त्याची प्रगती व्हावी, म्हणून याच अॅपमध्ये सराव घेता येणार आहे. दरम्यान, २० ऑगस्टपासून राज्यभरातील पर्यवेक्षकांकडून या अॅपद्वारे दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर पुनर्मुल्यमापनाचे काम सुरू झाले आहे.

राज्यभरातील पर्यवेक्षकांनी या कामात झोकून दिले असून सध्या रत्नागिरी जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात एकूण २२३ पर्यवेक्षक स्वयंप्रेरणेने काम करत असून आतापर्यंत या पर्यवेक्षकांनी निपुण महाराष्ट्र अॅपचा वापर करत जवळपास ७८ टके शाळांचे कामकाज पूर्ण केलेले आहे. अध्ययन स्तर निश्चिती करत असताना मराठी वाचन, लेखन, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया या चार विषयांची चाचणी घेण्यात आली. पर्यवेक्षकांनी अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने येत्या काही दिवसांत अध्ययन स्तर निश्चितीचे काम पूर्ण होईल, असे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 27/Sep/2025