रत्नागिरी : शहरातील नाचणेकडून विश्वनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव चारचाकीने बाजूपट्टीजवळील झाडाला जोरदार धडक दिली. त्या आवाजाने आजुबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा तिथे कोणीच नव्हते. अन्यथा, मोठा अनर्थ घडला असता. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) सायंकाळी उशिरा घडला. या प्रकाराची पोलिस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.
नाचणे मार्गावरून विश्वनगरकडे जाण्यासाठीच्या रस्त्यावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक भरधाव चारचाकी वेगाने येत होती. अचानक मोटार चालविणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती गाडी थेट झाडावर जाऊन धडकली. त्यापूर्वी तिथे उभी असलेल्या दुचाकीला धडक बसली. त्या गाडीचेही नुकसान झाले होते. झाडावर गाडी आदळल्याचा आवाज ऐकल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. क्षणभरात मोठी गर्दी जमली.
या प्रकारामुळे तिथे गोंधळ उडाला होता. घटनास्थळावरील गाडी बाजूला करण्यात आली. घटनास्थळावर असलेल्या काही नागरिकांनी ही घटना मोबाईलमध्ये टिपण्यास सुरुवात केली होती; मात्र त्यांच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ काहींनी डिलिट करायला भाग पाडल्याची चर्चा रंगली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेमधून नेण्यात आल्याचे घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितले; मात्र त्यांना कुठे नेण्यात आले याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेची रत्नागिरी पोलिस ठाण्यात कोठेही नोंद झालेली नव्हती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 27/Sep/2025












