लांजा : इसवली मठाचा पऱ्या ते सतीचा उंबर या रस्त्याच्या मजबुतीकरण, डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी इसवली येथील ग्रामस्थ उमेश कदम यांनी केली आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
कदम यांनी उपोषणाबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्या पत्रात नमूद केल्यानुसार इसवली मठाचा पऱ्या ते सतीचा उंबर रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून करण्यात आले होते; मात्र अवघ्या दीड ते दोन महिन्यातच रस्त्यावर खड्डे पडले असल्याने या रस्त्याची मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होती होती. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागामार्फत ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण काम करण्याची नोटीस दिली होती. तरीही ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करावी; मात्र प्रशासनाकडून हे काम योग्य पद्धतीने केल्याचा दाखला दिला आहे.
या प्रकाराचीही चौकशी करावी. यामध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी २ ऑक्टोबर रोजी ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत, असे त्या पत्रात नमूद केले आहे. या उपोषणाला इसवलीचे माजी सरपंच सचिन मेस्त्री यांनी पाठिंबा दिला असून, तेही उपोषणाला बसणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 27/Sep/2025












