Ratnagiri : निरुळमध्ये बिबट्याचा वावर

रत्नागिरी : तालुक्यातील निरूळ मावळतीवाडी परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वनविभागाने या परिसरामध्ये पिंजरे बसवून बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांच्या मनात असलेले भीतीचे वातावरण कमी करावे, अशी मागणी होत आहे

कोळंबे बडबेवाडी, गोरिवलेवाडी परिसरामध्ये चार दिवसांपूर्वी ब्लॅक पँथर व बिबट्या एकाच परिसरामध्ये दृष्टीस पडल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण हा परिसर अरुंद रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात आंब्याच्या बागा व झाडी असल्याने रस्त्यावरून जाताना बिबट्याच्या वावराचा मोठा धोका या परिसरात निर्माण झाला आहे. या संदर्भात नुकतीच वनविभागाने या भागाची पाहणी करून त्या ठिकाणी पुन्हा वावर दिसल्यास कॅमेरे बसविण्याचे नियोजन केले आहे; परंतु त्या परिसरात पुन्हा बिबट्याने मुक्काम हलवल्यामुळे रात्रीच्या वेळी कोणालाही त्याचा वावर दिसला नाही; मात्र दोन दिवसांपूर्वी रत्नागिरीकडून निरूळ ठीकवाडीकडे येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या दृष्टीस पडला. त्याच्या गाडीसमोर उडी मारून पलीकडे गेला म्हणून गाडी थांबून मागे वळून पाहता तो रस्त्याच्या कडेला थांबून होता.

या परिसरात रस्त्याच्या दुतर्फा आंब्याच्या बागा आहेत. हा परिसर जंगलमय असल्यामुळे येणाऱ्या वाहनचालकांना हा बिबट्या म्हणजे धोका आहे. त्या संदर्भात वनविभागाला कळविले आहे. कोळंबे बंडबेवाडी ते निरूळ ठीकवाडी या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे-नीलेश ठीक, ग्रामस्थ

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 27/Sep/2025