साडवली : आपण जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे जनतेचे सेवक समजूनच सामान्यांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. नगरपंचायत कारभारावर अनेक तक्रारी असूनही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. यावर संबंधितांची स्वतंत्र बैठक घेऊन त्वरित कार्यवाही करावी, असे आदेश आमदार निकम यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले.
संगमेश्वर तालुक्याची आमसभा झाली. यावेळी तहसीलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी अनंत लोकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते. आमसभेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला. यात अक्षरयात्रा पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार व लेखक, चित्रकार जे. डी. पराडकर यांचा समावेश होता. पंचक्रोशीत मजूर संस्था स्थापन करून रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मजुरांना पूर्वी महसूल विभागातर्फे दिला जाणारा मजूर दाखला आता मिळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. यावर टोलवाटोलवी करून तो नक्की कोणत्या विभागाने द्यावा, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यावर लवकरच दिरंगाई न करता तोडगा काढला जावा, अशी मागणी करण्यात आली.
स्मार्ट मीटरबाबतचे भ्रम दूर करा
आमसभेत स्मार्ट मीटरवर जोरदार चर्चा झाली. यावर जोपर्यंत शासनाच्या सर्व कार्यालयांत आधी हे मीटर बसवले जावेत व त्यानंतर वाडीवस्तीवर महावितरण कंपनीने प्रात्यक्षिक दाखवून याबाबतचे भ्रम दूर करावेत. तोपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसवू नयेत, असा ठरावही आमसभेत संमत करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 27/Sep/2025














