ZP School : डिंगणी येथील बंद मराठी शाळेची इमारत धोकादायक

संगमेश्वर : विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद झालेल्या डिंगणी (बागवाडी) येथील जिल्हा परिषद मालकीची असलेल्या मराठी शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. त्या इमारतीची वेळीच दुरुस्ती केली नाही तर ती केव्हाही जमीनदोस्त होईल, अशी शक्यता आहे.

पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असलेली ही शाळा शून्य विद्यार्थी पटसंख्येमुळे दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. शाळा सुरू असेपर्यंत इमारतीच्या डागडुजीसाठी प्रशासनाकडून निधी खर्च केला होता; मात्र हीच शाळा कायमस्वरूपी बंद पडल्यानंतर जिल्हा प्रशासनाला त्या इमारतीचा विसर पडला आहे. अवघ्या काही वर्षापूर्वी अध्यापनाचे धडे गिरवण्यासाठी येणाऱ्या लहान लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणारी सुशोभित शाळा आता विद्याथ्यांविना ओस पडली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे इमारतीच्या स्लॅबला गळती लागली आहे. पावसाचे पाणी इमारतीच्या खोलीत जाऊन इमारतीचे दरवाजे, खिडक्या तुटून गेल्याने ही इमारत उपडी भग्न झालेली आहे.

सध्या ती इमारत सरपटणारे प्राणी आणि जनावरे यांचे आश्रयस्थान बनलेली आहे. इमारतीमधील पंखे, कपाटे, पेट्या, लाकडी खुर्चा, टेबल, भांडी, पाण्याच्या टाक्या आदी सामानही ‘जैसे थे’च आहे. ते सुरक्षितस्थळी हलवण्याची किंवा सरकारदरबारी जमा करण्याची तसदीही शिक्षण विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या साहित्यांची किंमत कवडीमोल झालेली आहे. इमारतीच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी इमारतीत येऊन कपाटे आणि पायाच्या पेट्या गंजून गेल्या आहेत. आतील कागदपत्रे भिजून गेली आहेत. यापूर्वी या शाळेत शिक्षण घेतलेल्यांना भविष्यात कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचण निर्माण होईल, अशी भीती स्थानिक ग्रामस्थांमध्ये आहे, पावसाच्या पाण्यामुळे लाकडी दरवाजा खराब होऊन तुटला आहे. दरवाजा नसल्याने खोलीतील किमती सामान पळवण्यास चोरांना सोपे जाणार आहे. आतील कागदपत्रे पळवून त्याचा गैरवापरही केला जाण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे इमारत शेवटच्या घटका मोजत आहे. इमारतीमधील कागदपत्रे आणि मालमत्ता यांचे जतन करणे आवश्यक आहे.

डिंगणी येथील शाळा तीन वर्षांपूर्वी पटसंख्येअभावी बंद झाली होती. तेथील केंद्रप्रमुखांनी त्या शाळेतील साहित्य सुरक्षित ठिकाणी आणून ठेवलेले आहे. शाळा बंद असल्याने त्या इमारतीसाठी निधी मंजूर नाही- एस. पी. त्रिभुवणे, प्र. गटशिक्षणाधिकारी

डिंगणीतील त्या शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पावले उचलली पाहिजेत. पट नसला तरीही ती प्रशासनाची इमारत आहे. त्याचा शिक्षण विभागाच्या योग्य कामासाठी उपयोग करता येऊ शकतो. शक्य झाल्यास तिथे अंगणवाडीही सुरू करता येईल- संतोष येराडे, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 PM 27/Sep/2025