रत्नागिरी : शिक्षण विभागातर्फे सर्व शाळांमधील इयत्ता ३ री ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) २२ ते २५ ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३ हजार ३४ शाळांमध्ये ही परीक्षा होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खासगी अनुदानीत शाळांमधील ३ री ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांकरिता ही परीक्षा होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्ता निहाय अपेक्षित अध्यन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होत आहे.
या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी खालील तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (झढ) आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरून २०२४- २५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी-२ अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे. नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १० ते १२ जुलै २०२४ या कालावधीत आयोजित केली होती. यानंतर आता पॅट २ ची २२ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. जिल्ह्यात जि. प.च्या २ हजार ४२५ तर ६०९ खासगी अशा एकूण ३०३४ शाळांमध्ये ही परीक्षा होत आहे. या चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
गतवर्षी झाला होता सावळा गोंधळ
गतवर्षी पॅटच्या परीक्षेत सावळा गोंधळ झाला होता. प्रश्नपत्रिका अपुऱ्या आल्या होत्या. यामुळे शिक्षकांना रातोरात प्रश्नपत्रिकांची झेरॉक्स काढाव्या लागल्या होत्या. यामुळे गोंधळ उडाला होता. यावर्षी मात्र योग्य नियोजन केल्यामुळे प्रश्नपत्रिका पुरेशा आल्याचे शिक्षणविभागाने सांगितले.
पायाभूत चाचणी उद्देश
विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे. अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणमधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टीकोनातून मदत होईल. अध्ययनात मागे असणा-या विद्याथ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.
इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादणूक स्थिती समजण्यास मदत होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 22/Oct/2024












