Sangmeshwar: काजळी नदीवर मुर्शी येथे धरण उभारणार

संगमेश्वर : काजळी नदीवर मुर्शी (ता. संगमेश्वर) येथे धरणासाठी निधी उपलब्ध करून कायमस्वरूपी पाणीप्रश्न मार्गी लावणार आहे, असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी दिले.

मुर्शी गावातील नागरिकांना शासनाच्या विविध वैयक्तिक योजना प्रत्यक्ष घराघरात जाऊन पोहोचवण्याचे काम स्थानिक ग्रामपातळीवर करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळाला आहे. या उपक्रमाचे आमदार किरण सामंत यांनी विशेष कौतुक केले. या वेळी आमदार सामंत म्हणाले, जनतेच्या दारात योजना पोहोचल्या पाहिजेत तेव्हाच शासनाचा उद्देश पूर्ण होईल.

मुर्शी गावाने या दिशेने घेतलेले पाऊल कौतुकास्पद आहे. शेती, घरगुती वापर तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तर गावातील विकासकामांना नवी दिशा मिळेल. काजळी नदीवरील धरण हे त्यासाठीचे प्रभावी समाधान ठरणार असून, त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करून निधी आणणार आहे. गावागावात जाऊन थेट जनतेशी संवाद साधणे ही माझी जबाबदारी आहे. प्रत्येक गावाचा विकास आणि नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी नेहमी तत्पर राहणार आहे. मुर्शी येथील सभेत आमदार सामंत यांनी ग्रामस्थांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 27-09-2025