देशाच्या हवाई दलाचे वैशिष्ट्य असलेल्या फायटर प्लेन मिग 21 ला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. गेली सहा दशकं भारताच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजणाऱ्या फायटर प्लेनला निरोप देताना भावूक वातावरण झालं होतं.
चंदीगड एअरबेसवर या लढाऊ विमानाला अखेरचा निरोप देण्यात आला.गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मिग 21 फायटर प्लेन हवाई दलाच्या बलस्थानी होते. आता इतिहासाच्या पानात मिग 21 ची सुवर्ण अक्षरात नोंद झाली आहे. मिग 21 च्या ऑपरेशनल आठवणी आता या पुस्तकापुरत्या मर्यादित राहतील. मिग 21 हे लढाऊ विमान रशियाने (सोव्हिएत युनियन) 1950 च्या दशकात विकसित केले होते. त्यानंतर या विमानाने हवाई दलात आपला दबदबा निर्माण केला. मिग 21 लढाऊ विमान भारतात कधी आले? त्याची खासियत काय? हे फायटर प्लेन निवृत्त का केलं गेलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
भारतात मिग 21 हे लढाई विमान कधी आलं?
भारताने 1962 नंतर मिग 21 स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मिग 21 हे विमान 1963 मध्ये रशियातून आयात करण्यात आले. म्हणजेच मिग 21 भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 1963 मध्ये रूजू झाले होते. 11 जानेवारी 1963 रोजी लुगोवाया हवाई तळावर पहिल्यांदा मिग 21 फायटर प्लेन आकाशात झेपावलं. त्यानंतर अनेक युद्धांचं हे फायटर प्लेन साक्षीदार राहीलं आहे. अनेक युद्धात या लढाऊ विमानाने महत्त्वाची भूमिका बजावली. 1971 पासून कारगिल युद्धापर्यंत, तर बालाकोट हवाई हल्ल्यापासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारतीय सैन्याला या लढाऊ विमानाने बळ दिलं. भारतीय हवाई दलाने आजपर्यंत 870 हून अधिक मिग21लढाऊ विमाने खरेदी केली. मिग21 हे भारतीय हवाई दलाचे सर्वात विश्वासार्ह आणि सर्वात जास्त काळ टिकणारे लढाऊ विमान आहे. हवाई दलात या विमानाने किती महत्त्वाची भूमिका बजावली हे यातून दिसून येतं.
मिग 21 लढाऊ विमानाची खासियत
मिग 21 हे भारताचे पहिले सुपरसॉनिक जेट होते. मिग 21 या फायटर प्लेनचा कमाल वेग ताशी 2,175 किमी होता. मिशन पूर्ण केल्यानंतर डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हे विमान शत्रूच्या रडारवरून गायब व्हायचं. त्यामुळे भारतीय हवाई दलाला शत्रूवर विजय मिळवणं सहज शक्य झालं. मिग 21 चा वेग मॅक २ (ध्वनीच्या वेगाच्या दुप्पट) होता. त्याची रेंज 1470 किमी होती, तसेच 9800 किलोग्रॅमपर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता होती. क्षेपणास्त्र लोड करण्यासाठी या लढाऊ विमानावर चार हार्डपॉइंट्स होते.
मिग 21 लढाऊ विमान कोणत्या युद्धात भाग घेतला?
पाकिस्तान विरुद्ध 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या युद्धात मिग 21 ने महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूंसाठी हे लढाऊ विमान कर्दनकाळ ठरलं. त्यामुळे भारताला पाकिस्तानवर सहज विजय मिळवणं शक्य झाला. 1999 च्या कारगिल युद्धातही मिग 21 ची भूमिका महत्त्वाची ठरली. 2019 च्या बालाकोट हवाई हल्ल्यातही मिग 21 लढाऊ विमानावर विश्वास दाखवण्यात आला. इतकंच काय तर अमेरिकेने तयार केलेल्या एफ 16 वर हे विमान भारी पडलं होतं. पाकिस्तानने भारतावर हल्ल्यासाठी या विमानाचा वापर केला होता. पण मिग 21 ने हे विमान यशस्वीरित्या पाडल्यानंतर जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. कारण अमेरिकेने तयार केलेल्या आतापर्यंत सर्वात यशस्वी लढाई विमानांपैकी एक आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि बलाढ्य अशा अमेरिकेलाही धक्का बसला होता.
मिग 21 ला अखेरचा निरोप कसा दिला?
भारताच्या मिग 21 ला 26 सप्टेंबर 2025 रोजी चंदीगड येथे मोठ्या दिमाखात निरोप देण्यात आला. हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी 23 स्क्वॉड्रनमधील सहा विमानांसह शेवटची उड्डाण केलं. स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा यांनीही या युनिटमध्ये भाग घेतला होता. हवाई दल प्रमुख एपी सिंग यांनी 2777 क्रमांकाच्या मिग 21 फायटर प्लेनसह एअरबेसवर उतरले.मिग 21 सोबतचे हे त्यांचे शेवटचे उड्डाण होते. निरोप देताना मिग 21 लढाऊ विमानाला वॉटर गन सलामी देण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण प्रमुख अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एपी सिंह, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मिग 21 ला फ्लाइंग कॉफिन असा उल्लेख का झाला?
भारतीय हवाई दलाने मिग 21 ची सर्वात एडव्हान्स असलेल्या बायसनचा वापर केला. पण गेल्या काही वर्षांत या लढाऊ विमानाचे अनेक अपघात झाले. मिग 21 विमान अनेक अपघातांमुळे चर्चेत आले. भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यापासून शेकडो अपघात झाले. यात शेकडो वैमानिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मिग21 चा “फ्लाइंग कॉफिन” अशी ओळख निर्माण झाली. पण हवाई दलाच्या काही तज्ज्ञांच्या मते, लढाऊ विमानाचा “फ्लाइंग कॉफिन” असा उल्लेख चुकीचा ठरेल.
मिग 21 ची जागा कोण घेणार?
मिग 21 ची जागा आता तेजस एलसीए मार्क 1ए मिग 21 फायटर प्लेन घेईल. फेब्रुवारी 2021 मध्ये हवाई दलाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 48 हजार कोटींचा करार केला आहे. यात 83 विमानांसाठी करार केला. त्यानंतर 62,370 कोटी रुपयांच्या 97 तेजस लढाऊ विमानांसाठी करार करण्यात आला आहे. एलसीए तेजस कार्यक्रम 1980 च्या दशकात सुरू झाला. पहिले उड्डाण 2001 मध्ये झाले आणि 2003 मध्ये “तेजस” हे नाव देण्यात आलं. तेजस लढाऊ विमान हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि गुप्तचर मोहिमांमध्ये मारा करण्यास सक्षम आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:35 27-09-2025














