Rajapur : कोदवली येथे घरासमोर उभी केलेली बुलेटची चोरी

राजापूर : राजापूर शहरानजीकच्या कोदवली साईनगर परिसरातील घरासमोर लावलेली रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५० (बुलेट) ही महागडी मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली असुन तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गेल्या १५ दिवसात ही दुसरी बुलेट राजापुरातुन चोरटयांनी लांबविली असून यामुळे वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शमसुद्दीन अब्दुल्ला काझी (वय ६१), सध्या रा. साईनगर, कोदवली यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची हिरव्या रंगाची, एमएच ०८ बीएफ ३८८८ क्रमांकाची बुलेट मोटारसायकल २६/०९/२०२५ रोजी रात्री ८ वाजता त्यांच्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लावली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी २७/०९/२०२५ रोजी पहाटे ०४.२२ वाजण्याच्या मुदतीत ती गाडी जागेवर नव्हती. गाडी चोरीला गेल्याचे लक्षात येताच फिर्यादींच्या मुलाने तात्काळ घराजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये तीन अज्ञात इसम फिर्यादींच्या संमतीशिवाय आणि लवाडीच्या इराद्याने ही बुलेट मोटारसायकल चोरून नेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

या दृश्यामुळे ही चोरी अज्ञात चोरट्यांनी पूर्वनियोजित कट करून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शमसुद्दीन काझी यांनी तातडीने राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी २७/०९/२०२५ रोजी दुपारी २.३९ वाजता ही तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी या चोरीच्या गुन्ह्यासाठी भारतीय न्याय संहितेतील (इछड) कलम ३०३(२), ३(५) अंतर्गत तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्याच्या आधारे पुढील तपास सुरू केला असून, या तीनही अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. राजापूर शहरात झालेल्या या पहाटेच्या चोरीमुळे स्थानिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 29/Sep/2025