Devrukh : सोने व्यापारी अपहरणातील ३ संशयितांना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी

देवरुख : शहरातील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी एकूण ६ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. शुक्रवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व आरोपींना ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात मुंबई येथून २ संशयितांसह वापरण्यात आलेली वॅगनर कार जप्त करण्यात आली आहे. या अपहरण प्रकरणात अजूनही दोन ते तीन जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. दि. १७सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास केतकर हे साखरपाहून देवरुखकडे परतत असताना वांझोळे येथे अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले होते.

या घटनेतील आरोपींजवळील १४ लाखांचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम लुटल्यानंतर त्यांना वाटुळ येथे सोडण्यात आले. केतकर यांच्या फिर्यादीवरून देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी व देवरुख पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मंगळवारी या घटनेचा छडा लावला.

या प्रकरणी दीपक राजेश लोहिरे, विशाल मनोहर आचार्य, प्रणित संजय दुधाणे आणि राजेश अनंत नवाले यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. प्रारंभी २६ सप्टेंबरपर्यंतची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपासात आणखी २ आरोपींना ताब्यात घेण्यात पोलीस यशस्वी ठरले. या अपहरण प्रकरणातील सर्व ६ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 29/Sep/2025