Sangameshwar : मोरेवाडी परिसरात गव्यांच्या झुंजीत दोघांचा मृत्यू

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा येथील मोरेवाडी परिसरात शनिवारी आवळीचा माळ या मोकळ्या टेकडीवर दोन ताकदवान गव्यांचा झुंजीत मृत्यू झाला. ही झुंज इतकी तीव्र होती की दोन्ही गव्यांची शिंगे एकमेकांत घट्ट अडकली आणि ते सुटू शकले नाहीत. अखेरीस झुंजार लढतीदरम्यान श्वास गुदमरल्याने दोन्ही गव्यांचा मृत्यू झाला.

रविवारी पहाटे या घटनेची चाहल ग्रामस्थांना लागली. सकाळी रोजच्या प्रमाणे जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना आवळीच्या माळावर दोन गवे पडलेले आढळले. जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांची शिंगे एकमेकात अडकलेली होती. ग्रामस्थांनी तत्काळ माजी उपसरपंच बापू शिंदे आणि पोलिस पाटील दाभोळकर यांना ही माहिती दिली. दोघांनीही तातडीने वन विभाग आणि पोलिस यांना कळवले.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी, पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात ही नैसर्गिक घटना असल्याचे स्पष्ट झाले. परिसरातील इतर जनावरांचीही तपासणी करण्यात आली. गव्यांची झुंज हे वन्य प्राण्यांच्या स्वभावातील नैसर्गिक वर्तन आहे. हे दोन्ही गवे परिसरात कायम वास्तव्य करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मते, हे दोन्ही रेडे अनेकदा एकाच माळावर दिसत. वन विभागाकडून दोन्ही गव्यांच्या मृतदेहांचा पंचनामा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 29/Sep/2025