रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाले, टपरीवाले, भाजीवाल्यांना रत्नागिरी नगरपरिषदेने नोटीस बजावून त्यांच्या विहीत परवान्यांसह रहिवास पुराव्याचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. नोटीस मिळाल्याच्या पंधरा दिवसात ही कागदपत्रे द्यायची असून त्यांची छाननी झाल्यानंतर कारवाईचे नियोजन केले जाणार आहे.
शहरातील रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांवर कारवाई करण्याची मागणी मनसेसह इतरांनीही रत्नागिरी नगर परिषदेकडे केली आहे. या मागणीचा पाठपुरावा केला जात आहे. आता रत्नागिरी नगर परिषदेने त्या दिशेने कारवाईचे पाऊल उचचले आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील सर्व हातगाडी, फेरीवाले, टपरीवाले, भाजीवाल्यांना शुक्रवारपासून नोटीस बजावण्यात येत
आहे. या सर्व व्यावसायिकांना नोटीस बजावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे अतिक्रमण हटाव मोहीम पथकाचे अधिकारी विजय कदम यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील सर्वात मोठा असलेला ८० फुटी मुख्य रस्ता वाहनधारकांना पूर्णपणे वापरताच येत नाही. रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहनांसह इतर व्यावसायिक ठाण मांडून असतात. त्यामुळे या मार्गावर सतत वाहतुकीची तारांबळ उडत असते. इतर अंतर्गत रस्ते फारच अरुंद असून येथेही तिच अवस्था असते. त्यामुळे अनधिकृत आणि परप्रांतीय असलेल्या फेरीवाल्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर नगर परिषदेच्या मालमत्ता विभागाने नोटीस बजावून आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर व्यवसायाचे परवान्यांची कागदपत्रे मागितली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 29/Sep/2025














