Dabhole : कठडा तुटल्यामुळे दाभोळे नदीवरील पूल धोकादायक

साखरपा : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील दाभोळे गावातील काजळी नदीवरील पूल धोकादायक झाला आहे. या पुलावर काही दिवसांपूर्वी ट्रक धडकून झालेल्या अपघातात पुलावरील संरक्षक कठडा मोडला आहे.

दाभोळे गावानजीक प्रवेश करताना महामार्गावर एक छोटा पूल आहे. हा पूल वाहतुकीसाठी अरुंद तर ठरत आहेच पण सध्या हा पूल कठड्याविना धोकादायकही झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी पुलावर समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात एक चौदाचाकी ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. ट्रक वेगात असल्यामुळे ही धडक जोरदार होती. त्यामुळे पुलाच्या कठड्याचा एक भाग तुटून खाली नदीत पडला. त्यामुळे महामार्गाचा हा भाग आता उघडा पडला आहे.

मुळातच हा पूल गेली काही वर्षे वाहतुकीस अरुंद ठरत आहे. समोरासमोर दोन वाहने आल्यास पुलावरून पादचाऱ्यांना चालण्यास जागा उरत नाही. अशावेळी कठड्यावर चढून पादचाऱ्यांना उभे राहावे लागते. त्यात आता कठड्याचा काही भाग तुटून गेल्यामुळे हा पूल वाहतुकीस आणि पादचाऱ्यांसाठीही धोकादायक झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 AM 29/Sep/2025