Rajapur : खिणगिणी गावात उभारणार हवामान केंद्र

राजापूर : खिणगिणी पंचक्रोशीत आंबा, काजू बागायतींची मोठ्याप्रमाणात लागवड केली आहे. मात्र, दरवर्षी बदलते वातावरण आणि अवकाळीमुळे शेतकरी, बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. त्यापोटी शेतकऱ्यांना विमा योजनेतील नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे खिणगिणी गावात हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती प्रशासक प्रभाकर आपटे यांनी दिली. हवामान केंद्र उभारणीसाठी आवश्यक असलेली शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचे यावेळी निश्चित करताना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावच सर्वांगीण विकास साधण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील खिणगिणी ग्रामपंचायतीची प्रशासक श्री. आपटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. या सभेला विजय पाध्ये, अशोक डोंगरकर, मनोज कदम, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती पाटील उपस्थित होते. प्रशासक श्री. आपटे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांसह प्रशासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यावर ग्रामस्थांनी सविस्तर चर्चा केली. गेल्या काही वर्षात हवामानात सतत बदल होत आहेत. त्याचा आंबा, काजू बागायतींना फटका बसत असून बागायतदारांचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. अशा प्रतिकूल स्थितीत बागायतीसह पिकांना संरक्षण मिळावे म्हणून पिक विमाही उतरविण्यात येतो. मात्र, तांत्रिक कारणामुले या भागातील बागायतदारांचे नुकसान होवूनही विम्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या भागात हवामान केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ग्रामसभेत घेतला आहे. यावेळी झालेल्या चर्चेत श्री. कदम, श्री. पाध्ये आदींसह अन्य ग्रामस्थांनी भाग घेतला.

लोकसहभागातून स्वच्छता अभियान
महसूल रेकॉर्डला नोंदी नसलेले गावातील रस्ते, पाणंद यांची महसूल रेकॉर्डला नोंदी करणे, विधवा अनिष्ठ प्रथा बंद करणे आदी निर्णयही यावेळी घेण्यात आले. ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गावात लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले, असे श्री. आपटे यांनी सांगितले

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 29/Sep/2025