Lanja: कुर्णेतील साग चोरीप्रकरणी पाच वाहनांसह 11 जण ताब्यात; कोट्यवधी रूपयांचा मुद्देमाल जप्त

लांजा : लांजा तालुक्यातील वन विभागाच्या कुर्णे येथील राखीव वनक्षेत्रातून सागाच्या झाडांच्या चोरी प्रकरणी वनविभागाने 11 जणांसह क्रेन, एक ट्रक, दोन बोलेरो पिकअप अशी पाच वाहने असा जवळपास कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लांजा तालुक्यातील कुर्णे गावामध्ये मुंबई-गोवा महामार्गालगत अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर वनविभागाचे 17 हेक्टर राखीव क्षेत्र आहे. या क्षेत्रातील सागांची झाडे बिनधास्तपणे तोडून रातोरात क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये भरून झाडे महामार्गावरून वाहतूक करत राजापूर तालुक्यातील कुंभवडे व माडबन पठार या ठिकाणी सुरक्षित नेण्यात आली. या घटनेची संबधित यंत्रणेला कोणतीच समज नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या घटनेत अदृश्य यंत्रणेचा वरदहस्त असल्यामुळेच चोरट्यानी धाडस केले असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

कुर्णे येथील वन विभागाच्या राखीव वनक्षेत्रातून लाखो रुपये किंमतीच्या सागाच्या झाडे तोडून त्यांची रातोरात विल्हेवाट लावण्याच्या धक्कादायक प्रकारामुळे लांजा व राजापूर येथील वृक्षडतोड वर्तुळात हलचल सुरू झाली आहे. या साग चोरीच्या घटने प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी प्रक्रिया सुरू झाली आहे. राजापूर तालुक्यामधून येऊन लांजा तालुक्यातील वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रातून सागाची झाडे तोडण्याचे धाडस होतेच कसे यासह लांजा वन विभागाला पुसटशी कल्पना नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. साग चोरीचा प्रकार दडपाण्याचा डाव चोरट्यांचा फसला असून वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वृक्ष प्रेमींकडून केली जाते आहे. या कारवाईत आतापर्यंत तब्बल 90 लाखांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. वन विभागाने चोरट्यांना ताब्यात घेतले असले तरी यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेणे गरजेचे आहे. साग चोरी प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी तालुक्यातून आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंडचे नाव चौकशीअंती लवकरच पुढे येण्याची दाट शक्यता आहे. मात्र वन विभागाच्या राखीव क्षेत्रातील सागाची झाडे दुसर्‍या तालुक्यातून येऊन तोडून नेण्याची मजल चोरट्यांनी दाखवल्याने चोरट्यांवर वनविभागाचे भय राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 29-09-2025