राजापूर : कुणबी नावाखाली मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये घुसत आहे. आज एका भागापुरत्या झालेल्या शासन निर्णयाची व्याप्ती भविष्यामध्ये राज्यभर होऊ शकते. त्यामुळे शांत न बसता आतापासून संघर्षाचा लढा उभारणे गरजेचे आहे. न्यायालयीन लढ्यासोबत रस्त्यावरचीही लढाई लढणे गरजेचे आहे. भावी पिढीच्या भविष्यासाठी होणार्या या लढ्यामध्ये सर्वांनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अध्यक्ष अनिल नवगणे यांनी केले.
कुणबी समाजोन्नती संघातर्फे पुढील महिन्यात मुंबई येथे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन छेडले जाणार आहे. त्याअनुषंगाने कुणबी समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी राजापुरात शुक्रवारी कुणबी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अनिल नवगणे होते. अध्यक्षस्थानी कुणबी समाजोन्नती संघ ग्रामीण शाखा राजापूरचे अध्यक्ष दीपक नागले होते.या मेळाव्याला कुणबी संघाचे अरविंद डाफळे, राजापूर शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, ओबीसी जनमोर्चाचे राजापूरचे अध्यक्ष महेश शिवलकर, प्रकाश मांडवकर, रवींद्र नागरेकर, मधुकर तोरस्कर, मानसी दिवटे, सत्यवान कणेरी, चंद्रकांत जानस्कर, अॅड. महेंद्र मांडवकर, नरेश शेलार यांसह कुणबी संघाचे पदाधिकारी आणि ओबीसी समाजनेते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
अनिल नवगणे पुढे म्हणाले की, पुढील महिन्यामध्ये मुंबई येथील आझाद मैदानावर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन होणार आहे. त्यामध्ये मोठ्यासंख्येने सहभागी होवून ‘मुंबई चक्का जाम करून ओबीसीसह कुणबी बांधवांची ताकद शासनाला दाखवून देऊया. ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर म्हणाले, ओबीसी आरक्षण आणि त्याबाबत शासन निर्णय याचा आढावा घेताना कुणबी नावाखाली घुसण्याचे आणि त्यातून ओबीसी आरक्षण संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. मराठा समाजाला कुणबी असल्याची जाणीव कधी झाली? असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. अॅड. शशिकांत सुतार यांनी ओबीसी आरक्षण, त्यासंबंधित कायदेशीर बाबी सविस्तरपणे मांडताना ओबीसी आरक्षण बचावाचे महत्व अधोरेखित केले. यावेळी प्रकाश मांडवकर, श्रीकृष्ण वणे, शिवाजी तेरवणकर, अॅड. महेंद्र मांडवकर आदींनीही मार्गदर्शन केले. दीपक नागले यांनी प्रास्ताविक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 29-09-2025














