रत्नागिरी : कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे जतन संवर्धन तसेच प्रचार, प्रसारासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि रत्नागिरीतील निसर्गयात्री संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. त्यामुळे कोकणातील कातळशिल्पांची माहिती एमटीडीसीत निवासासाठी येणाऱ्या पर्यटकांपर्यंत पोहोचणार असून तेथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
पर्यटन आणि शाश्वत विकास या संयुक्त राष्ट्र पर्यटन संस्थेने दिलेल्या घोष वाक्याला अधीन राहून कातळशिल्प संवर्धन कार्यक्रम हाती घेतला आहे. जागतिक पर्यटनदिनाचा औचित्य साधून एमटीडीसीचे प्रधान कार्यालय आणि संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवास येथे कार्यक्रम झाला. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटने यांनी रत्नागिरीतील कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राला भेट दिली. तसेच गणपतीपुळे येथे आयोजित कार्यक्रमात निसर्गयात्री संस्थेच संस्थापक अध्यक्ष तसेच कोकणातील कातळशिल्प शोधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि प्रादेशिक व्यवस्थापक एमटीडीसीचे दीपक माने या दोघांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला.
युनेस्को जागतिक वारसास्थळ दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेत कोकणातील ९ अश्मयुगीन कातळशिल्पे समाविष्ट आहेत. त्यात उक्षी, जांभरूण, कशेळी, देवहसोळ, रुंडे, बारसू, देवाचेगोठणे (रत्नागिरी), कुडोपी (सिंधुदुर्ग), फणसाईका (गोवा) यांचा समावेश आहे. कोकण पर्यटन क्षेत्रात आणि त्याअनुषंगाने सर्वांगीण विकासात या कातळशिल्पांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
२५०० हुन अधिक कातळशिल्प
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० गावातील २०० ठिकाणी सुमारे २५०० हून अधिक कातळशिल्पांची नोंद झाली आहे. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशी ९ कातळशिल्प युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कातळावर कोरलेल्या कातळ खोद शिल्पाचे वेगळे महत्त्व आहे. त्याचा संशोधकांकडून आपापल्यापरीने लावला आहे.
कातळशिल्पांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एमटीडीसीने चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. कोकणातील हा पुरातन ठेवा कानाकोपऱ्यांत पोहोचणार आहे. याद्वारे पर्यटनाला चालना मिळणार असून भविष्यात रोजगारही निर्माण होईल-सुधीर रिसबूड, निसर्गयात्री
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 29/Sep/2025














