Ratnagiri : जिल्ह्यातील सार्वजनिक पाणी स्रोतांचे होणार सर्वेक्षण

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिलत कक्षाच्या पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रमांतर्गत २ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींमध्ये ७हजार ७९० सार्वजनिक पाणी स्रोतांचा समावेश आहे.

पाणी गुणवत्ता सर्वेक्षण वर्षातून दोनदा पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर केले जाते. यंदा हे मॉन्सूननंतरचे सर्वेक्षण ग्रामपंचायतीमधील जलसुरक्षक, ग्रामपंचायत अधिकारी आणि आरोग्य सेवक यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी या सर्वेक्षणासाठी जबाबदार असतील. या सर्वेक्षणाअंती, ग्रामपंचायतींना पाण्याच्या स्रोतांच्या जोखमीच्या दर्जानुसार चार प्रकारची कार्डे वितरित केली जाणार आहेत.

यामध्ये ग्रामपंचायतीतील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या तीव्र जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असेल, तर त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाणार आहे. तसेच ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असेल, तर त्या ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड दिला जाईल. हिरवे कार्डासाठी ग्रामपंचायतीमधील ७० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या कमी जोखमीच्या स्रोतांवर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतीला दिले जाणार आहे. चंदेरी कार्डासाठी सलग पाच वर्षे साथीचे रोग न झालेल्या ग्रामपंचायती पात्र राहतील, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:55 PM 30/Sep/2025