Ratnagiri: कोकण रेल्वेच्या सतर्क TC मुळे चिमुकल्याची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका; रेल्वेकडून 15 हजारांचे बक्षीस जाहीर

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसमध्ये एका तिकीट तपासनिसाने (टीसी) दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अपहरण झालेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. संदेश चव्हाण असे या कर्तव्यदक्ष टीसीचे नाव असून, त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कोकण रेल्वे प्रशासनानेही त्यांची तात्काळ दखल घेत त्यांना पंधरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे.

टीसी संदेश चव्हाण यांना आला संशय

घटना २७ सप्टेंबर रोजी दादरहून सावंतवाडीकडे जाणाऱ्या ट्रेनमधील आहे. कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना एका प्रवाशासोबत असलेल्या लहान मुलाचे वागणे संशयास्पद वाटले. तो इसम त्या मुलाला विचित्र पद्धतीने हाताळत होता, ज्यामुळे चव्हाण यांच्यासह इतर प्रवाशांनाही काहीतरी अघटित घडत असल्याचा संशय आला.

चव्हाण यांनी तात्काळ त्या इसमाकडे जाऊन चौकशी सुरू केली. मात्र, तो व्यक्ती उडवाउडवीची आणि असंबद्ध उत्तरे देऊ लागला. यामुळे चव्हाण यांचा संशय अधिकच बळावला की, हे मूल त्याचे नसून त्याने ते पळवून आणले आहे.

जीवाची पर्वा न करता आरोपीला धरले

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संदेश चव्हाण यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या इसमाला पकडून ठेवले. त्यांनी धावत्या ट्रेनमधूनच कोकण रेल्वेच्या नियंत्रण कक्षाशी (वाडी बंदर, मुंबई) संपर्क साधला आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती दिली.

माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळे आणि ताजने यांच्या मार्गदर्शनाखाली ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी ट्रेन ठाणे स्थानकात पोहोचताच संशयित इसमाला ताब्यात घेतले.

मुंबईच्या KEM रुग्णालयातून केले होते अपहरण

पोलिसांनी संशयित आरोपी अमोल अनंत उदलकर (वय ४२, रा. इंदील, देवगड) आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलाला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने ते मूल मुंबईतील केईएम रुग्णालयातून पळवून आणल्याची कबुली दिली. आयुष अजयकुमार हरिजन (वय २) असे त्या मुलाचे नाव आहे. आयुषची आई रुग्णालयात उपचार घेत असताना, तो आपल्या आजीजवळ होता. त्याचवेळी आरोपी अमोलने संधी साधून त्याचे अपहरण केले होते. यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कर्तव्यदक्ष टीसीचा सत्कार

टीसी संदेश चव्हाण यांनी दाखवलेल्या या धाडसामुळे एका निष्पाप मुलाचे प्राण वाचले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत १५,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संदेश चव्हाण यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एका सामान्य टीसीने दाखवलेल्या असामान्य धाडसामुळे एका कुटुंबाला त्यांचा मुलगा परत मिळाला, याबद्दल संपूर्ण कोकण रेल्वे आणि प्रवासी वर्गातून चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 30-09-2025