दापोली : शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील बसस्थानक परिसर आणि दापोली-खेड महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मोठा खड्डा पडलेला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ लोखंडी प्लेट टाकून आणि बॅरिकेडस् लावून तात्पुरता तोडगा काढल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या डागडुजीबद्दल स्थानिक नागरिक आणि प्रवासी संतप्त झाले आहेत.
खेडकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्यावर खड्डा दुरुस्त करण्याऐवजी त्यावर मोठी लोखंडी प्लेट ठेवून बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. परिणामी रस्त्याचा मोठा भाग अडवला गेल्याने वाहतुकीसाठी फक्त एक अरुंद मार्ग शिल्लक राहिला आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. यात भर म्हणून बॅरिकेडच्या बाजूला काही वाहनधारक अवैध पार्किंग करतात. त्यामुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागतो. मागून येणाऱ्या वाहनांचा पार्क केलेल्या गाड्यांवर धडकण्याचा धोका कायम असून, कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
नागरिक, प्रवाशांमध्ये असंतोष
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्याने असंतोष वाढला आहे. दापोलीतील रहिवासी आणि प्रवासी यांची मागणी आहे की, संबंधित विभागाने तातडीने या खड्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका दूर करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हा खड्डा तसाच आहे. लोखंडी प्लेटवरून गाडी जाताना घसरण्याचा धोका कायम असतो. आम्ही वारंवार तक्रार केली तरी काहीच कारवाई होत नाही. तसेच बॅरिकेडस्मुळे रस्ताच अडला आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीत शाळकरी मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन जायला लागते. अवैध पार्किंगमुळे परिस्थिती आणखी बिघडते. तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्यास परिणाम फार वाईट होतील, याची नोंद सार्वजनिक बांधकाम खात्याने घेणे गरजेचे आहे-सलीम रखांगे, नागरिक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 30/Sep/2025














