Sangameshwar- Devrukh Road : संगमेश्वर ते देवरुख रस्ता खड्डेमय !

कडवई : मुंबई-गोवा महामार्गावरून कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मार्ग संगमेश्वर-देवरुख रस्ता खड्ड्यांनी भरल्याने वाहनांची गती मंदावली आहे. दोनच वर्षांपूर्वी नवीन बनवलेला संगमेश्वर देवरुख रोड. या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मार्लेश्वरला जाण्यासाठी या मार्गाने जावे लागते. संगमेश्वर ते देवरुख प्रवास करणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. परंतु नवीन रस्ता बनवताना म्हणावी तितकी काळजी न घेतल्याने नवीन रस्त्याचे कोटिंग निघून जुना रस्ता उखडला आहे.

सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तिथे डबकी तयार झाली आहेत. ही डबकी बुजविताना वापरण्यात आलेल्या चिऱ्यामुळे अजूनच बिकट परिस्थिती झाल्याचे जागोजागी दिसून येत आहे. या खड्ड्यातून गाडी चालवताना जहाजात बसल्याचा फील प्रवाशांना येत आहे. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची खडी पसरवून मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु ही खडी सगळीकडे पसरून दुचाकी चालकांचे खूप हाल होत आहेत. खडीमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 30/Sep/2025