Chiplun : चिपळूण ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची पहिली मदत सोलापूरला रवाना

चिपळूण : मराठवाड्यात आलेल्या महापुरामुळे ८०० हून अधिक गावे बाधित झाली आहेत. लाखो लोकांचे स्थलांतर केले जात आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेकडून पूरग्रस्तांना तातडीची आवश्यक मदत म्हणून सुमारे २०० ग्रामस्थांसाठी किट पाठवण्यात आले.

प्रथमच मराठावाड्यास महापुराच्या आपत्तीला सामोरे जावे लागले. सोलापूर जिल्ह्यात शेकडो गावांत शेतीसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तेथील आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत देण्याची भूमिका चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतली. त्यानुसार रविवारी चिपळूण पंचायत समितीत संघटनेची बैठक झाली. या बैठकीला तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील आपत्तीची माहिती घेत तेथे तातडीची गरज कोणती आहे, त्याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार कपडे, विविध प्रकारचे धान्य, चादर, टॉवेल आदी गरजेच्या वस्तू निश्चित करण्यात आल्या. यासाठी सर्वानी वर्गणी गोळा केली. पंचायत समिती मधील अधिकाऱ्यांनी देखील याकामी आर्थिक मदत केली. यातून जमलेल्या निधीतून २०० किट तयार केले. तालुक्यातील पिंपळी खुर्द ग्रामपंचायतीने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. ग्रामपंचायतीने पूरग्रस्तांना आवश्यक असलेल्या वस्तूंचे ५० किट तयार करून ते सोलापूर जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना दिले आहे. सोमवारी सकाळी पंचायत समिती येथून ते सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना पाठवण्यात आले. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांसह, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 30/Sep/2025