Chiplun : दुर्गम, डोंगर उतारावर शेतकऱ्यांच्या श्रमातून फुलली नाचणीची शेती

चिपळूण : दुर्गम, डोंगर उतारावर, जेथे निराशा आपले तळ ठोकून बसते, तेथेच काही श्रमजीवी हात मातीशी बालपणापासून संवाद साधत आहेत. चिपळूण तालुक्यातील भैरवगडाच्या पायथ्याशी वसलेल्या तळवडे ग्रामपंचायतीमधील पाते या वाडीत दत्ताराम धामणकर (वय ७५), काशिराम निकम (७५), आणि राजाराम धामणकर (५५) या तिघांची कष्टमय गाथा केवळ शेती नाही, तर अखंड जिद्दीचा मंत्र आहे. याच डोंगर उतारावरील या ज्येष्ठ शेतकऱ्यांचे श्रम विशेषतः युवा पिढीला एक प्रेरणास्रोत ठरले आहे.

गावचे पोलिसपाटील बळीराम साळुंखे यांच्यासह या शेतीला प्रत्यक्ष भेट देवून त्यांच्या श्रमाची कहाणी जाणून घेतली. पारंपरिक पद्धतीने नाचणी, वरई (भगर) आणि कुटकी (कांग) यांसारख्या महत्त्वपूर्ण तृणधान्यांचे पीक हे वृद्ध घेतात. मे महिन्याच्या पहिल्या मशागतीपासून ते तण काढणीपर्यंत काशिराम निकम अविरत मेहनत घेतात. दत्ताराम धामणकर वयाच्या १२ व्या वर्षापासून शेती करतात. नाचणी, वरी अशा धान्यांचे उत्पादन घेतात. वन्य प्राण्यांच्या वाटणीचे वगळता खंडी, दीड खंडी उत्पन्न घेतात.

काशिराम निकम हेही मे पासून शेतीची मशागत सुरु करतात. त्याचं कांग म्हणजे कुटकी, नाचणी यांचे दाणे फेकून रोपे उगवली जातात. त्या रोपांची विरळणी करतो. ही रोपे अन्य ठिकाणी लावली जातात. हरळी काढून शेतातील पाणी काढले जाते. पेरणी, बेणनी, विवळ म्हणजे तण काढणी अशी शेतकामे करतात. सांबर, डुकरं, माकडं अशा वन्य प्राणांच्या तावडीतून उरलेलं धान्य त्यांचं असतं, तर राजाराम धामणकर हे सहकारी शेतकऱ्यांच्या मदतीने सर्वच शेती उत्पन्नासाठी मेहनत घेतात. नाचणी, वरी, कांग यासारखे उत्पन्न वर्षाला खंडी, दीड खंडी या मेहनतीतून मिळते.

निसर्गाचे आव्हान स्वीकारत आणि निसर्गाशी समेट साधत त्यांची ही शेती सुरू आहे. रिकाम्या काचेच्या बाटलीला लोखंडी खिळा लावून हवेच्या झोताने आवाज निर्माण करण्याची त्यांची ही अभिनव पद्धत, शून्य खर्चात नैसर्गिक संरक्षण देणारी ठरली आहे. संपूर्ण जगात २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे झाले. या तृणधान्यांमध्ये ‘श्री अन्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाचणीचे महत्त्व अनमोल आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी यांनी या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

नाचणी ‘श्री अन्न’
१०० ग्रॅम नाचणीमध्ये प्रथिने ७.३० टक्के, पिष्टमय पदार्थ १.३० टक्के, स्निग्ध पदार्थ ३.६० टक्के, तंतुमय पदार्थ ३.९० टक्के, लोह २.७० टक्के, ३४४ मि.ग्रॅम. कॅल्शीयम, २८३ मि.ग्रॅ. फॉस्फरस आढळून येतात. म्हणून तिला ‘श्री अन्न’ म्हणतात. नाचणीचे पदार्थ खल्ल्याने कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. लहान मुलांची हाडे बळकट होतात. लहान मुले, गर्भवती महिला, वयस्कर व्यक्तींना नाचणीचे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 30/Sep/2025