मंडणगड : सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यात शेवटच्या रविवारी २८ सप्टेंबर २०२५ अखेर मंडणगड तालुक्यात ३७१३.५७मिलिमीटर इतका पाऊस झाला. यंदाच्या हंगामात वार्षिक सरासरीच्या ९५.३० टक्के इतका पाऊस झाला आहे. २८ सप्टेंबर रोजी तालुक्यात ८८.७५ मिलिमीटर पाऊस झाला.
यंदा मान्सनूचे हंगामास मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच सुरुवात झाली. यंदाच्या खरीप हंगामात म्हणजे पेरणीच्या आधीच पाऊस आल्याने खरिपातील भातासह विविध पिकांच्या पेरण्यांना विलंब झाला. कारण पावसाने सुरुवात केल्यावर विश्रांती घेतली नाही. त्यामुळे पेरणीच्या नेहमीच्या नक्षत्राच्या कालावधीत पेरणीच झाली नाही. अनेकांची शेतीचे भाजावणीची कामेही अर्धवट राहिली. त्यामुळे पिकांचा हंगाम लांबणीवर आहे, हे स्पष्ट असताना पावसानेही नेहमीची सरासरी भरुन काढण्यासाठी आपला मुक्काम वाढविला आहे. त्याचा भात, नाचणीच्या पिकावर विपरीत परिणामाची शक्यता आहे.
परतीच्या पावसाचे संकेत निसर्ग, पशू-पक्षी व जीव कीटकांच्या माध्यमातून देत लागला असला, तरी १० ऑक्टोबर अखेर पाऊस लांबणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदा तालुक्यात तालुक्यात २७०० हेक्टर इतक्या जमीन क्षेत्रात भात लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाचा भात पिकावर विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 30/Sep/2025














