रत्नागिरी : संचमान्यतेनुसार दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोनपैकी एका रिक्त पदावर डीएड, बीएड् अर्हताधारक उमेदवाराची कंत्राटी शिक्षक पदावर नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होतो. मात्र, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सुमारे ३५० कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सुमारे चौदाशे नियमित शिक्षकांची भरती करण्यात आली होती. शिक्षक भरतीनंतरही सुमारे १,२०० शिक्षकांची पदे रिक्त होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन शासनाने १० किंवा १० पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये ४५० कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याने सुशिक्षित डी. एड., बी. एड़, धारकांनी पंचायत समिती स्तरावर अर्ज सादर केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समितीस्तरावर १०६ कंत्राटी शिक्षकांना नियुक्ती पत्रे दिली. ते संबंधित शाळांवर हजरही झाले. उर्वरित सुमारे ३५० शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने ही भरती प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत थांबविली आहे. ही कंत्राटी शिक्षक भरती सुरू असतानाच काही परजिल्ह्यांतील उमेदवारांनी पोलिस पाटलाचे दाखले घेऊन स्थानिक असल्याची बतावणी केली. ही बाब स्थानिक उमेदवारांच्या लक्षात येताच त्यांनी याविरोधात आवाज उठविला, त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी तहसीलदारांचा रहिवासी दाखला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
स्थानिकांना संधीची मागणी
जिल्हा परिषदेने कंत्राटी भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी, यासाठी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनही करण्यात आले होते. तसेच आमदार राजन साळवी यांनीही शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भरती प्रक्रियेत स्थानिकांना संधी द्या, अशीही मागणी करण्यात आलेली होती. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही सुरू केली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:42 PM 22/Oct/2024












