रत्नागिरी, दि. ३०: रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षणाची उत्सुकता आज संपली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या सोडत प्रक्रियेत आगामी काळासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता स्पष्ट झाली आहेत. विशेष म्हणजे, अनन्या अक्षय उकीरडे या चिमुकलीच्या हस्ते या आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तहसीलदार (सर्वसाधारण) मीनल दळवी यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आरक्षण सोडत प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर, अनन्याच्या हस्ते एका-एका पंचायत समितीसाठी आरक्षणाची चिठ्ठी उचलण्यात आली. या पारदर्शक प्रक्रियेनंतर निश्चित झालेले आरक्षण राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
असे आहे नऊ पंचायत समित्यांचे आरक्षण:
सर्वसाधारण (खुला प्रवर्ग): चिपळूण, गुहागर, रत्नागिरी
सर्वसाधारण (महिला): मंडणगड, संगमेश्वर, लांजा, खेड
नागरिकांचा मागासवर्ग (OBC): दापोली
नागरिकांचा मागासवर्ग (OBC – महिला): राजापूर
या आरक्षण सोडतीमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी या महत्त्वाच्या पंचायत समित्या खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने येथे मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर मंडणगड, संगमेश्वर, लांजा आणि खेड या चार तालुक्यांमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी मिळाली आहे. दापोली आणि राजापूर तालुक्यांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला संधी मिळाली असून, राजापुरात महिलेला सभापती होण्याचा मान मिळणार आहे.
या सोडतीमुळे इच्छुकांच्या नजरा आता पक्षीय पातळीवरील निवडीकडे लागल्या असून, जिल्ह्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:47 PM 30/Sep/2025














