Dapoli : कोकण कृषी विद्यापीठ कर्मचारी भरती अधिवेशनात गाजणार ?

दापोली : दापोली कोकण कृषी विद्यापीठात होत असलेली विविध पदांसाठीची कर्मचारी भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडेल असे दिसत आहे. होत असलेली भरती प्रक्रिया ही पारदर्शक नसून यात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय आमदार भास्कर जाधव यांनी विद्यापीठाला दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. तर या भरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती द्यावी, असे देखील जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र तरी ही विद्यापीठाने जाधव यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत माळी, पहारेकरी अशा पदांची नियुक्तीपत्र उमेदवार यांना दिली आहेत. ही नियुक्तीपत्र ही मर्जीतील लोकांना दिली आहेत, असा आक्षेप प्रकल्पग्रस्तांचा आहे.

या बाबत आमदार भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे कर्मचारी भरती प्रक्रिया आगामी आशिवेशनात चांगलीच गाजेल असे दिसत आहे. तर भरती प्रक्रियेत गुणांची पेन्सिलने खाडाखोड करणारे अधिकारी चांगलेच गोत्यात येतील असे देखील दिसत आहे.

दापोली कोकण कृषी विद्यापीठात अनेक वर्षाने कर्मचारी भरती प्रक्रिया होत आहे. भूमिहीन आणि अनेक वर्षे विद्यापीठात राबणारे मजूर यांना प्रथम प्राधान्य, त्यामुळे अनेकांचा या भरती प्रक्रियेने वनवास संपेल असे वाटत असताना या भरती प्रक्रियेचा सारा खेळ एका राजकीय पुढाऱ्यांच्या घरी, विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या संघनमताने होत असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी केला, त्यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. ही बाब कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या निदर्शनास आणून दिली गेली आहे. त्यामुळे तो राजकीय पुढारी कोण? आणि तो विद्यापीठाचा साहेब कोण? अशी चर्चा दापोलीत जोरात सुरू आहे.

या कर्मचारी भरती प्रक्रिये बाबत विद्यापीठ अधिकारी यांची आय डोन्ट नो सारखी बेजबाबदार उत्तरे याचा संताप प्रकल्पग्रस्त शेतकरी व्यक्त करत असून या प्रक्रियेत गोलमाल आहे असा रोष देखील शेतकऱ्यांनी व्यक्त करत आहेत.

भरतीत घोळ
उमेदवार निवड करताना त्याला मिळालेले गुण पेन्सिलने लिहिले गेले. ते गुण गुणपत्रिकेत आले नाहीत. ज्या उमेदवारांनी अचूक उत्तरे दिली, कामाची कुशलता दाखवली, त्यांना डावलले गेले. कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्य, असे असताना कामाचा अनुभव नसलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले गेले. असा सगळा घोळ आहे, असे प्रकल्पग्रस्त शेतकरी सांगत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:20 PM 30/Sep/2025