खेड : सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. परेश मळणगावकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी रुग्णालयातील सिस्टर महाडिक यांचीही उपस्थिती होती. या व्याख्यानामध्ये डॉ. मळणगावकर यांनी हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच हृदयाची काळजी कशी घ्यावी, दैनंदिन जीवनशैलीत कोणते बदल आवश्यक आहेत, योग्य आहार, नियमित व्यायाम व तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व यावर त्यांनी विशेष भर दिला.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण झाली असून आत्मविश्वासातही भर पडल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. अनिता आवटी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. के. केळकर, प्रा. एस. व्ही. मस्के यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. के. केळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुप्रिया काडगे यांनी मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:01 PM 30/Sep/2025














