देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी

नवी दिल्ली : सीआरपीएफच्या (CRPF) दिल्लीसह देशभरातील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्व सीआरपीएफ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे.

सोमवारी रात्री देशातील अनेक शाळांना हा मेल आला होता.

दरम्यान, तपासणीनंतर शाळांमध्ये काहीही आढळून आले नाही. मेल पाठवणाऱ्याने सकाळी ११ वाजेपर्यंत सीआरपीएफच्या सर्व शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. मेल पाठवणाऱ्याने डीएमकेचे माजी नेते जफर सादिक यांच्या अटकेचा उल्लेख केला होता. जफर सादिक यांना एनसीबी आणि नंतर ईडीने अटक केली होती.

दिल्लीतील ज्या दोन सीआरपीएफ शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यापैकी एक रोहिणी आणि दुसरी द्वारका येथील आहे. या मेलचा रोहिणी येथील प्रशांत विहारमध्ये झालेल्या स्फोटाशी कोणताही संबंध नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा या शाळांच्या व्यवस्थापनाला पाठवलेल्या ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. तपासादरम्यान बॉम्बस्फोटाची माहिती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.

दिल्लीत सुरक्षा वाढवली
या धमकीनंतर सीआरपीएफने आपल्या सर्व शाळांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दिल्ली पोलिसांनी सीआरपीएफ शाळांबाहेरही सुरक्षा वाढवली आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

यापूर्वीही अशा प्रकारची धमकी
४ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमधील तीन इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. यामुळे कॅम्पसमध्ये घबराट पसरली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि बसवानगुडी येथील बीएमएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि सदाशिवनगरमधील एमएस रमैया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांना दुपारी एकच्या सुमारास ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. मात्र, शोध घेतल्यानंतर ही धमकीची अफवा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 22-10-2024