Ratnagiri : कळझोंडी-वरवडे परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील वरचे वरवडे मेस्त्रीवाडी नजीकच असलेल्या जुन्या पुलाजवळ बिबट्या दिसल्याने कळझोंडी येथील धरण कर्मचारी केतन लिंगायत याची भंबेरी उडाली. अशा परिस्थितीत असून ही जीव मुठीत घेऊन तो कसातरी बचावला आहे. तरी वन खात्याने या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वरवडे वरचे व कळझॉडीवासिय ग्रामस्थांनी केली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील वरवडे वरचे मराठवाडी येथून केतन लिंगायत हे नेहमीप्रमाणे सायंकाळी सात वाजता कळझोंडी धरण येथे पंप चालक म्हणून नाईट ड्युटीसाठी आपल्या दुचाकीने येत होते. याच दरम्यान वरवडे वरचे मेखीवाडी येथील जुन्या पुलावर बिबट्या दिसला. अचानक या बिबट्याचे डोळे दुचाकीच्या लाईटसमोर दिसताक्षणी कर्मचारी केतन लिंगायत याची भंबेरी उडाली. यामुळे त्याला काय करावे, पुढे जावे की मागे जावे काहीच कळत नव्हते.

अशा परिस्थितीत अतिशय चतुराईने केतन लिंगायत याने आपली दुचाकी वळवली आणि गणेश मोरे यांच्या घरी जाऊन आसरा घेतला. भयभीत झालेल्या केतन लिंगायत यांना गणेश मोरे यांनी पाणी दिले, धीर दिला आणि स्वतःच्या दुचाकीने केतन लिंगायत याला घेऊन धरणावर पोहोच केले.

गेली चार-पाच वर्षे वरवडे कळझॉडी या भागात अनेक बिबट्यांनी अनेक जनावरे मारली आहेत. या भागातील बरेच कुत्रे, वासरं, गाई, बैल यांच्यावर हल्ला करून फस्त केलेल्या घटना वनविभागाला माहिती आहेत. याबाबत काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही दिली गेली आहे; परंतु येथील माणसांच्या जीवितालाही प्रचंड मोठा धोका निर्माण झाला आहे. आठ दिवसांपूर्वी कळझोंडी बौद्धवाडी येथील रहिवासी सार्थक पवार यांचा कुत्रा, तर शेतकरी हरिश्चंद्र पवार यांचा कुत्रा बिबट्याने घरातून ओढून नेलेले आहेत.

तरी वन विभागाने कळझोंडी- वरवडे मार्गावर असलेल्या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी कळझोंडी व वरवडे त्याचबरोबर जयगड प्रादेशिक नळ पाणी योजनेतील कर्मचाऱ्यांनी केली आहे. सैतवडे, चाफेरी, आगरनरळ या भागात ही बिबट्यांचा वावर असतो, असा अनेक प्रवासी, कर्मचाऱ्यांना अनुभव आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 01/Oct/2025