Krushi Samruddhi Yojana : कृषी समृद्धी योजनेतून लाखोंचे मिळणार अनुदान

रत्नागिरी : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी समृद्धी योजना ही शासनाची योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर शेतकऱ्यांनी कृषी समृद्धी योजनेतील विविध योजनांचा लाभघेता येणार आहे, शेतकऱ्यांनी लाखोंचे अनुदान मिळवावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

या योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या खरेदीसाठी शेतावर विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपला ग्रीस्टैंक फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नसल्यास आपल्या नजीकच्या सोएससी सेंटर, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्राम महसल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अॅग्रीस्टैंक फार्मर आयडी काढून घ्यावा.

सुक्ष्म सिंचन सुविधा या बाबीमधून इलेक्ट्रीक मोटर पंप, डिझेल, पेट्रोल इंजिन, शेततळे, पाईप संच पुरवठा, ठिबक सिंचन व तुषार सिंचन यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण या बाबीमधून ट्रॅक्टर, पॉवर टिलर, पॉवर विडर, ब्रश कटर, फवारणी पंप, भात कापणी यंत्र, कडबा कुट्टी, श्रेडर, वड चीपर, सपारी काढणी यंत्र इत्यादी यंत्र अवजारांना अनुदान मिळणार आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या बाबीमधून उच्च तंत्रज्ञानावर आधारीत रोपवाटीका, क्षेत्रविस्तार घटकांतर्गत ड्रॅगन फ्रूट, पुष्पोत्पादन, फळपिके, मसाला पीके, अळिंबी उत्पादन, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, काढणीत्तोर व्यवस्थापन फॉर्म गेट पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र-काजू, आंबा आणि पणन सुविधा उ. बाबींकरीता शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या बाबीमधून कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास १० हे. पर्यंत काजु, आंबा, नारळ, कोकम, फणस इ. फळपिकांना अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया या बाबीमधुन कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना ३० टक्के किंवा ५० लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी आज्ञावलीवर अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी नजीकच्या ‘आपले सरकार ई-सेवा केंद्र मधे जाऊन किंवा mahadbt.gov.in या संकेतस्थळावरून देखील अर्ज करता येऊ शकेल.

कृषी समृद्धी योजनेसंदर्भात संबंधितांनी काही शंका/अडचणी असल्यास ०२२-६१३१६४२९ या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वा. (सोमवार ते शुक्रवार) दरम्यान संपर्क करू शकता. योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल प्रणाली विकसित केले आहे. ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पध्दतीने शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. आपण अर्ज केलेल्या यंत्र, अवजाराची आवश्यक कागदपत्रे घेवून आपली निवड झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अपलोड करावेत, अन्यथा महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज रद्द करण्यात येऊन लाभापासून वंचित राहू शकतात. शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी

महाडीबीटीवरील ५ हजार १७ शेतकऱ्यांची निवड
सद्यस्थितीमध्ये सन २०२५-२६ मध्ये जिल्हयामध्ये महाडीबीटी प्रणालीवर एकूण ५ हजार १७शेतकऱ्यांची वेगवेगळ्या बाबीसाठी निवड झालेली आहे. त्याकरीता १८.५७ रुपये कोटी इतका निधी खर्च होणार आहे. याव्यतिरिक्त बरील योजनांसाठी रकम ७४ कोटी रुपये कृषी समृध्दी योजनेमधून निधी रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्राप्त होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 01/Oct/2025