Solapur Mahapur : पाकणीतील ३५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू रवाना; चिपळूण तालुक्याचा मदतीचा हात !

चिपळूण : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पाकणी गावावर आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी चिपळूण शहरातील सामाजिक संस्था, दानशूर नागरिक आणि प्रशासनाने पुढाकार घेत सुमारे ३५० कुटुंबांसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा रवाना केला.

मंगळवारी (ता. ३०) सकाळी कापसाळ येथील विश्रामगृहातून आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून मदतीची गाडी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना झाली. यावेळी स्थानिक प्रशासन, नगरपालिका अधिकारी, स्वयंसेवक आणि मदतीसाठी पुढे आलेले नागरिक उपस्थित होते.

या गाडीतून पाठवण्यात आलेल्या मदतीमध्ये तांदूळ, गहू पीठ, तूर डाळ, हरभरा डाळ, साखर, खाद्यतेल, चहा पावडर, मीठ, मसाले, बिस्किटे आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. सर्व साहित्य व्यवस्थित बांधून ट्रकमधून सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात पाठवण्यात आले. या उपक्रमात प्रांत कार्यालय, चिपळूण पालिका, तहसील कार्यालय, पोलिस प्रशासन, तसेच काही सामाजिक संस्था व स्थानिक स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.

चिपळूणकरांनी वेळप्रसंगी दाखवलेली एकजूट आणि सामाजिक जाणिवा प्रेरणादायी आहेत. आज राज्यभरात आपत्तीग्रस्त भागांना अशाच प्रकारच्या मदतीची गरज आहे-भास्कर जाधव, आमदार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 01/Oct/2025