रत्नागिरी : लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कोत्रेवाडी वस्तीला लागून लादण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) विरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या बेमुदत साखळी उपोषणाला आता माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा पाठिंबा मिळाला आहे.
प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घनकचरा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी १३ ऑक्टोबर रोजी बच्चू कडू स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून हा प्रश्न मार्गी लावणार आहेत.
लांजा नगरपंचायतीचा हा घनकचरा प्रकल्प कोत्रेवाडी वस्तीला लागून नियोजित असल्याने तो आरोग्यासाठी हानिकारक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे प्रदूषण वाढेल आणि रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थ गेल्या ४७ दिवसांहून अधिक काळ साखळी उपोषणाला बसले आहेत.
इतके दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न आल्याने माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घातले आहे.
१३ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या शेतकरी, मच्छिमार, आंबा बागायतदार व दिव्यांग बांधवांच्या मेळाव्यासाठी बच्चू कडू उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान ते जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रकल्प रद्द करण्याबाबत मागणी करणार आहेत, तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल जाब विचारणार आहेत, असे त्रिपाठी यांनी सांगितले. बच्चू कडू यांच्या एन्ट्रीमुळे आम्हा कोत्रेवाडी ग्रामस्थांना निश्चित न्याय मिळेल, अशा आशादायक भावना उपोषणास बसलेल्या कोत्रेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 01-10-2025














