Mandangad : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी

मंडणगड : सप्टेंबरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगामातील भात, नाचणी, वरी या हाताशी आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी मंडणगड येथील प्रगतिशील शेतकरी सौरभ घोसाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठीचे निवेदन तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केले आहे.

तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन दिले तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील भात, नाचणी, वरी या प्रमुख पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकावर बुरशी लागून रोग पडला आहे. परिणामी उत्पादनात घट झाली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या भात कापणीस आलेले असताना पाऊस पडत असल्याने पीक हातातून निघून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

या संदर्भातील पिकांचे नमुने सादर करताना नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून अहवाल शासन दप्तरी ठेवण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वते केली आहे. या वेळी शैलेश घोसाळकर, सुभाष दळवी, शिवंम दळवी, नयन खैरे उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० हेक्टरमध्ये १०० शेतकरी बाधित झाल्याचा अंदाज आहे. कृषी विभागाचे कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. आकडेवारी वाढीची शक्यता आहे. – सोमनाथ अहिरकर, तालुका कृषी अधिकारी

गतवर्षी जिल्ह्यात १२५ टक्के पाऊस पडला. यंदा सरारीच्या ९५ टक्के पाऊस झाला आहे. मॉन्सूनने मुक्काम लांबणार असल्याने पावसाच्या अनियमेतचा फटका पिकांना बसत आहे. राज्यशासनाने यंत्रणेच्या माध्यमातून पीक नुकसानीचा अहवाल तयार करून तातडीने मदत जाहीर करावी. – सौरभ घोसाळकर, शेतकरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 01/Oct/2025